- भाजपमध्ये अखेर एकमत; सोमवारी निर्णयाची शक्यता?…
- सात नावांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दीर्घकाळ सुरू असलेली अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांमुळे ही प्रक्रिया लांबली होती; मात्र अलीकडेच प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय साधला गेल्याने सात नावांवर सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत या नावांना अंतिम मंजुरी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी पक्षांतर्गत विविध गटांकडून वेगवेगळ्या शिफारशी पुढे आल्याने निवड प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. ज्येष्ठ कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक यांच्यातून निवड करताना संतुलन राखण्याचे आव्हान पक्षासमोर होते.
सात जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्याने अंतिम निर्णय प्रदेश नेतृत्वाकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर काही नावांवर एकमत झाल्याचे समजते.
नामदेव ढाके, सचिन साठे, विजय फुगे, सुषमा तनपुरे, सुजाता पालांडे आदींची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मागील सर्वसाधारण सभेत यादी सादर न झाल्याने विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे यावेळी तरी निर्णय होणार का, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच
निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देऊ नये, या पक्षस्तरीय भूमिकेवर स्थानिक पातळीवर कितपत अमल होईल, याबाबतही चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी काही नावांबाबत फेरप्रस्तावही सभेसमोर येणार आहे.
या संदर्भात प्रशांत शितोळे यांनी, पक्षात एकमत झाले असून अंतिम यादी प्रदेश नेतृत्वाकडून प्राप्त झाल्यानंतर ती सर्वसाधारण सभेत सादर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.










