- मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा २०२६-२७ ला उत्साहात सुरूवात…
- दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले मैदान पूजन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ एप्रिल २०२६) :- दिव्यांग मुलांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले सर्वसाधारण मुलांसारखीच प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित या क्रीडा स्पर्धा या उपक्रमाचाच भाग असून भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथे मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपायुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, खेळाडू, नागरिक उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यानिमित्ताने क्रीडा संकुलात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे. एखादी क्रीडा स्पर्धा ही केवळ पदक जिंकण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी आणि समाजात समावेशकतेचा मजबूत संदेश देण्याचे प्रभावी माध्यम आहे. भविष्यात अशा उपक्रमांद्वारे दिव्यांग मुलांच्या क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
उपायुक्त पंकज पाटील यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिलीतर प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
आजच्या कार्यक्रमात महापालिका उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य तुषार सहाणे हेही उपस्थित होते.
या स्पर्धेत धावणे, गोळाफेक, लांब उडी, सॉफ्ट बॉल तसेच इतर विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून या स्पर्धेमध्ये दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला आहे.










