न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ एप्रिल २०२६) :- पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांबाबत बैठक मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाश भवन, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे पार पडली. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. यात प्रामुख्याने पिंपरी शहरासाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे, ही मुख्य मागणी त्यांनी केली.
पिंपरी शहरातील संभाजीनगर, काळभोरनगर, विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर, शंकरनगर , मोरवाडी , आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी गाव, दापोडी, संत तुकाराम नगर परिसर व इतर विविध भागांमध्ये अलीकडे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. सदर भागांना सध्या टाटा टेल्को उपकेंद्रामार्फत वीजपुरवठा केला जात असून त्याच उपकेंद्रावरून चाकण, आनंदी, तबादले जाधववाडी, चिखली या दूरच्या भागांनाही वीजपुरवठा होत असल्याने त्या उपकेंद्रावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे पिंपरी शहरासाठी इलेक्ट्रिकल सबस्टेशन आवश्यक आहे अशी मागणी केली, यावेळी आमदार गोरखे यांनी केली.
आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख मागण्या :
1) अतिरिक्त वीज भार असलेले रोहित्रांची क्षमता वाढविणे.
2) वीज अपघात टाळणेसाठी ट्रान्सफॉर्मर्सना FRP फेन्सिंग करणे.
3) जुन्या कमकुवत झालेल्या एल टी व एच टी केबल बदलून नवीन टाकणे.
4) जुने खराब झालेले एल टी फीडर पिलर (मिनी, ४ वे, ६ वे) बदलून नवीन बसविणे.
5) एचटी व एलटी उपरी वीज लाइन भूमिगत करणे.
6) पिंपरी विधानसभेअंतर्गत विविध भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन सबस्टेशनची उभारणी करणे.
7) अपघाती क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मर व डीपी स्ट्रक्चर नवीन ठिकाणी शिफ्ट करणे.
शहरामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. यावर तोडगा म्हणून पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे, हा एकमेव पर्याय असल्याचे देखील आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले आहे.










