न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) :- रावेत परिसरात मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी तसेच मित्रांना महिलेचे व तिच्या आईचे मॉर्फ केलेले नग्न फोटो पाठवले.
तसेच संबंधित फोटो विविध अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचा दावा करत, ते हटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अन्यथा फोटो अधिक प्रमाणात प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी पुरुष फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टार्फे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपीकडून वापरलेले मोबाईल व इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात येत आहेत.











