- केंद्रीय गृहराज्यमंत्री रामदास आठवले आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार भूमिपूजन..
- शहर आरपीआय अध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची माहिती..
- भारतीय जनता पक्षाचे मानले आभार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २४ एप्रिल २०२६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या स्मारक उभारणीस अखेर मंजुरी मिळाली आहे. आज महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे यांनी येत्या २८ तारखेला पिंपरीत या स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री रामदास आठवले साहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाव्हळकर यांनी म्हटले आहे की, ‘पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारील आरक्षित जागेत माता रमाई यांचे स्मारक उभारण्याची मागणी माझ्यासह महापालिकेचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी समाजाकडून दीर्घकाळापासून होत होती. त्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात येत होता. परंतु, प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काही केले नाही. अखेरीस महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय पक्षाची सत्ता आल्यावर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न तातडीने निकाली निघाला आहे, असेही ते म्हणाले.
चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचारामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने स्मारकाचा प्रश्न रेंगाळण्याची चिन्हे होती. याची चाहूल लागताच पक्षाचे सर्वेसर्वा आठवले साहेब आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर रवी लांडगे व स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही जोरदार मागणी केली. अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही या स्मारकासाठी अखेरीस अर्थसंकल्पात सुधारणा करून स्मारकासाठी आवश्यक तो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. दरम्यान या स्मारकाच्या उभारणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. तसेच या कामी आमदार शंकरभाऊ जगताप, महापौर रवि लांडगे व स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे समस्त आरपीआय पक्षाच्या वतीने आभार मानतो, असे या पत्रकात कुणाल वाव्हळकर यांनी म्हटले आहे.
असा आहे स्मारकाचा आराखडा…
“माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुमारे २५,००० चौ. फूट भूखंडावर भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी २३ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या स्मारकात ७.५ फूट उंचीचा भव्य पुतळा, २५ आकर्षक म्युरल्सद्वारे माता रमाई यांच्या जीवनकार्याचे दर्शन, तसेच अभ्यासिका, प्रतीक्षा गृह, सुंदर कारंजे, उद्यान आणि नागरिकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासोबतच अत्याधुनिक विद्युत व्यवस्था देखील करण्यात येईल.
“माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेला आधार, त्याग आणि समर्पण अतुलनीय आहे. त्यांच्या कष्टांमुळेच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य करता आले. त्यामुळे माता रमाई यांचे योगदान हे देशाच्या इतिहासात तितकेच महत्त्वाचे आहे. स्मारक उभारणीस मंजुरी मिळणे म्हणजे त्यांच्या त्यागाची आणि संघर्षाची अधिकृत दखल घेणे होय. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि समाजाला कृतज्ञतेची जाणीव करून देईल. पिंपरी-चिंचवड शहराला अशा ऐतिहासिक कार्यात सहभागी होता येत असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही हे स्मारक भव्य, सुबक आणि सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत.” – कुणाल वाव्हळकर, पिंपरी चिंचवड शहर आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनपा…











