- नागरिक वैतागले; तर २९ एप्रिलला ‘टाळे ठोको आंदोलन’..
- नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांचा महावितरणाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ एप्रिल २०२५) :- प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत, किवळे, विकासनगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, निष्काळजी सेवेविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी याबाबत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच रावेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, परिसरात वारंवार वीज खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळी वीज गेल्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी वेळेत पोहोचत नाहीत. अनेकदा संध्याकाळी उशिरा काम सुरू होऊन विलंबाने वीज पुरवठा पूर्ववत केला जातो. तसेच नवीन वीज कनेक्शन देण्याच्या प्रक्रियेतही मोठा विलंब होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, केवळ २०० रुपयांचे वीज बिल थकल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो, यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “बिल वसुलीसाठी कठोर नियम असतील, तर सेवा देताना देखील तितकीच काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या वतीने येत्या बुधवारी (दि. २९) ‘टाळे ठोको आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी ऐश्वर्या तरस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.











