न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली, (दि. ०५ मे २०२६) :- विक्रीकराची तब्बल ५२ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी न भरल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१३-१४ ते २०१७-१८ या कालावधीत पाटीलनगर, चिखली येथे घडल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी राज्यकर निरीक्षक सोमनाथ रणदिवे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चंद्रकांत महादेव मोरे व एक महिला आरोपी (दोघे रा. पाटीलनगर, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित व्यापाऱ्याने विवरणपत्रे भरली असली तरी २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीसाठी निर्धारणेस हजर राहिले नाहीत. तसेच वारंवार नोटीस देऊनही विक्रीकराची थकबाकी भरलेली नाही.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर अधिक तपास करत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.












