- सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या बैठकीत चर्चा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, विमा, पदोन्नती, निवास आणि वेतनासंदर्भातील प्रश्नांवर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी केली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.














