न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे, नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करणे, पूरप्रवण भागांतील नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन करणे आणि ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रुग्णालयांमध्ये अखंडित वीजपुरवठा, राखीव बेड्स, निवारा केंद्रांची तयारी आणि धोकादायक इमारतींची पाहणी करण्यावर भर देण्यात आला.
पावसाळ्यात साथीचे रोग टाळण्यासाठी साफसफाई, निर्जंतुकीकरण, धुरीकरण तसेच स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत ‘अतिक्रमणमुक्त फुटपाथ’ मोहिमेचाही आढावा घेण्यात आला.














