- प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील घटना; उद्यान विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- प्राधिकरणातील सर्वाधिक वर्दळीच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पहाटे मोठी दुर्घटना टळल्याची घटना घडली आहे. उद्यानातील सुमारे ३५ वर्ष जुन्या “पिचकारी” जातीच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून पदपथावर कोसळली. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली.
स्थानिक नागरिकांच्या मते, झाडांची अशास्त्रीय आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली छाटणी यामुळे झाडाच्या एका बाजूला अतिरिक्त वजन निर्माण झाले होते. त्यामुळे झाड दोन भागांत दुभंगून मोठ्या आवाजात कोसळले. अवकाळी पाऊस आणि वळवाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्यान विभागाचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे शहरातील हरित संपदा धोक्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या वृक्ष छाटणीमुळे अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले असून येत्या काही दिवसांत वादळी पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष तथा पर्यावरण अभ्यासक डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, महापालिकेचा उद्यान विभाग शहरातील उद्यानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. वाढते प्रदूषण, धुळीचे प्रमाण आणि बेकायदा वृक्षतोड यामुळे शहरातील हरित पट्टा वेगाने नष्ट होत आहे. “आज पहाटेच्या वेळी फांदी कोसळली म्हणून मोठी दुर्घटना टळली. काही मिनिटांनी नागरिक फिरण्यासाठी उद्यानात आले असते तर गंभीर जीवितहानी झाली असती,” असे त्यांनी म्हटले आहे.
—













