- नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात १६ मे २०२६ पासून घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून ही मोहीम १४ जूनपर्यंत चालणार आहे. या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती संकलित करणार आहेत.
घरांची संख्या, रहिवाशांची माहिती तसेच मूलभूत सुविधांची नोंद या प्रक्रियेत करण्यात येणार आहे. संकलित माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित धोरणे तयार करते. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट केले. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्य यशस्वी करावे, असे आवाहन केले.














