- इंधन बचतीच्या नावाखालील राष्ट्रवादीकडून दिखावूपणाचा निषेध..
- सत्ताधारी भाजपच्या ‘इंधन बचाव मोहिमे’वर साधला निशाणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या इंधन बचाव मोहिमेचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षातील तीन नगरसेवकांनी आज बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश केला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात मोठी चर्चा रंगली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे, प्रतिक्षा राजेंद्र लांधी-जवळकर आणि स्वाती (माई) चंद्रकांत काटे यांनी बैलगाडीतून महापालिकेत येत भाजपच्या इंधन बचाव मोहिमेवर टीका केली. “महापालिकेत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असताना केवळ दिखाव्यासाठी इंधन बचतीच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांवर नियम लादले जात असताना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या खर्चावर नियंत्रण आणावे,” असा आरोप आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी केला.
महापालिका मुख्यालयाबाहेर बैलगाडी पोहोचताच नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. आंदोलनादरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली. शहरातील वाढते इंधन दर, वाहतूक समस्या आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात हा प्रतीकात्मक निषेध असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.













