न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- शिवसेनेच्या पदाचा आणि पक्षाच्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर करून अधिकारी तसेच सामान्य नागरिकांवर दबाव टाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शिवसेना उपनेते तथा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अशा पदाधिकाऱ्यांना थेट पक्षातून हकालपट्टीचा इशारा देत पक्षात खळबळ उडवून दिली आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षात काही पदाधिकारी पक्षाच्या नावाचा आणि लेटरहेडचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी ही कठोर भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. “माहिती अधिकाराचा वापर जनहितासाठी व्हावा, मात्र काही जण तो त्रास देण्यासाठी वापरत आहेत. हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
बारणे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिवस-रात्र जनतेसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असताना काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
“शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत असेल, तर संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. अशा व्यक्तींना पक्षात स्थान दिले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, यापूर्वीही पदाचा गैरवापर करणाऱ्या काही जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, बारणे यांच्या या विधानामुळे शिवसेनेत आगामी काळात पक्षांतर्गत शिस्तीचा बडगा अधिक कठोरपणे उगारला जाणार असल्याची चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.













