- नागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ मे २०२६) :- देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि नागरी विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत पिंपरी-चिंचवड शहरातील जनगणना कर्मचारी सक्रियपणे योगदान देत आहेत. विविध विभागांतील कर्मचारी घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत असून, अचूक व विश्वासार्ह माहिती नोंदविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, जनगणना जबाबदारी आणि नियमित नागरी सेवा यांचा समतोल राखत कर्मचारी समर्पणाने काम करत आहेत. संकलित माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ शासकीय नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जनगणना ही शहर आणि देशाच्या विकासाचा मूलभूत आधार असल्याचे सांगितले. अचूक माहितीच्या आधारे भविष्यातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि विकास योजनांचे प्रभावी नियोजन शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारचा ओटीपी मागितला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.















