न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ मे २०२६) :- मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे आणि पूरजन्य परिस्थितीवर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या नियंत्रण कक्षांमुळे नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे, आपत्कालीन परिस्थितीचे समन्वय साधणे आणि आवश्यक मदतकार्य तत्काळ पोहोचवणे शक्य होणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, सुसज्ज संप्रेषण व्यवस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मान्सून काळात शहरातील पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी, जलद आणि समन्वयित पद्धतीने पार पाडणे सुलभ होणार आहे.
पूरनियंत्रण, बचावकार्य, मदत शिबिरे, आरोग्य सुविधा व आपत्कालीन प्रतिसादासाठी “मान्सून कृती आराखडा २०२६” कार्यान्वित
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “मान्सून कृती आराखडा २०२६” तयार केला असून सर्व विभागांना समन्वयाने काम करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता, पूरनियंत्रण, तात्काळ मदत, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे.
पूरस्थितीचे L0 ते L4 अशा विविध स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येणार आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी, धरण विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
धरण विसर्गावर सतत देखरेख ठेवण्याच्या सूचना..
पवना, मुळशी व इतर धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग याबाबतची माहिती नियमितपणे घेऊन परिस्थितीनुसार संबंधित विभागांना सतर्क करण्यात येणार आहे. धरण विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या भागांमध्ये तातडीने सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना..
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूरबाधित व सखल भागांची पाहणी करून संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठ, नाले, पाणी साचणारी ठिकाणे आणि पूरप्रवण भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.















