- अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडसत्र; लाखो रुपयांचे रसायन जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- दापोडी-फुगेवाडी परिसरातील विषारी दारूकांडात सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेत व्यापक धाडसत्र सुरू केले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर सलग कारवाया करण्यात येत असून गेल्या २४ तासांत मावळ, खेड, चाकण आणि शिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली.
शिरगाव परिसरात पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे रसायन जप्त केले. पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी घटनास्थळावरून पसार झाली. त्यानंतर पवना नदीकाठावर सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर कारवाई करत सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले. आणखी एका कारवाईत ओझर्डे गावाजवळ ३ लाख ८५ हजार रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले. या सर्व प्रकरणांत महिला आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
चाकणमधील बहुळ गाव परिसरातही पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ४० हजार रुपयांचे रसायन आणि प्लास्टिक ड्रम जप्त करून नष्ट केले. तर निघोजे परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करून १० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
दापोडी-फुगेवाडी विषारी दारूकांडानंतर पोलिस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात पोलिसांकडून सातत्याने छापेमारी केली जात असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धाडसत्रामुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

















