न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ३० मे २०२६) :- खराबवाडी येथे वाईन शॉपबाहेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एका युवकावर काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी राहुल गावडे, सलमान नदाफ आणि गुफरान अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रिपन बरमन हा मित्रांसोबत उभा असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी काचेच्या बाटल्या फेकून मारहाण केली. एका बाटलीचा फटका फिर्यादीच्या डोक्याला बसल्याने तो जखमी झाला.
आरोपींनी परिसरात मोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. यामुळे नागरिकांनी पळापळ केली तसेच काही दुकानदारांनी दुकाने बंद केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.















