न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे पालन करणे बंधनकारक असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या किंवा २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या आस्थापनांचा ‘बल्क वेस्ट जनरेटर्स’मध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा संस्थांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करणे, केंद्रीकृत पोर्टलवर नोंदणी करणे आणि कचरा व्यवस्थापनाची नियमित नोंद ठेवणे आवश्यक आहे.
महापालिकेकडून संबंधित संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्यास पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.














