न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगतच्या सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. तसेच ताथवडे आणि पुनावळे अंडरपासच्या रुंदीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दिली.
पुण्यात झालेल्या बैठकीत आमदार जगताप यांनी सयाजी अंडरपास, भूमकर चौक, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी अंडरपास परिसरातील वाढत्या वाहतुकीकडे लक्ष वेधले. सध्याचे भुयारी मार्ग अपुरे पडत असून सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत परिसरात वाढत्या वाहतूक ताणामुळे अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्स आणि नवीन अंडरपास उभारण्यालाही केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नागरिकांसह आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.















