न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीविरोधात प्रशिक्षण व नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी सौरव राजन नायर (वय २५, रा. देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हिंजवडी फेज २ येथील इमारतीत असलेल्या थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीचे सीईओ हर्षल भानुदास ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुविल पारेख, एचआर सौम्या सिंग तसेच कंपनीतील इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ पासून आजपर्यंत आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी व इतर उमेदवारांकडून प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले. त्यानंतर संबंधितांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून दोन महिने काम करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी कारणे देत उमेदवारांना पगार देण्यात आला नाही. तसेच जमा केलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारात एकूण ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, संबंधित रक्कम आरोपींनी स्वतःच्या वापरासाठी वळविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.















