- आठ दिवसांत १६१ गुन्हे दाखल; ५२ हजार लिटरहून अधिक गावठी दारू जप्त व नष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गावठी हातभट्टी तसेच इतर अवैध दारू धंद्यांविरोधात पोलिसांनी व्यापक विशेष मोहीम राबवली असून, गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत १६१ गुन्हे दाखल करण्यात आले असून १७० आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच तब्बल ५२ हजार २०९ लिटर गावठी व हातभट्टी दारू जप्त अथवा नष्ट करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार २८ मे २०२६ पासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अवैध दारू व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकारी व अंमलदारांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असून शहरातील विविध भागात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे ते १ जून २०२६ या कालावधीत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत तसेच दारूबंदी कायद्यान्वये अनेक कारवाया करण्यात आल्या.
दारू उत्पादनाविरोधात मोठी कारवाई
हातभट्टी दारू उत्पादनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या ६ गुन्ह्यांमध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत २२ हजार ०५० लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत १ लाख २१ हजार रुपये इतकी आहे.
विक्री करणाऱ्यांवरही कारवाई
गावठी व हातभट्टी दारू विक्रीसंदर्भात दारूबंदी कायद्यांतर्गत १४५ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १५४ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून २८ हजार ९६९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत १९ लाख ५५ हजार २०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकूण ४० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
संपूर्ण मोहिमेत एकूण ४० लाख ५ हजार ५३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त अथवा नष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी गावठी दारू, हातभट्टी, अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आपत्कालीन क्रमांक ११२, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षाचा मोबाईल क्रमांक ९५२९६९१९६६ आणि दूरध्वनी क्रमांक ०२०-२६२०९१२२ जारी करण्यात आला आहे.















