न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने मे २०२६ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल ६२ हजार ७२७ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी वाहतूक शाखेकडून दररोज विशेष कारवाया करण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत विविध प्रकारच्या नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये सिग्नल जंपिंगच्या ८ हजार ४८३, ट्रिपल सीटच्या ६ हजार ५३९, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १ हजार ९९३, ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४०२, मॉडिफाईड सायलेंसरच्या १ हजार ३२, नो पार्किंग व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १९ हजार ३४० वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच टोईंग कारवाईत ११ हजार ५८० वाहने उचलण्यात आली.
वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून दंडात्मक व न्यायालयीन कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.















