- बिनविरोध निवडणुकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुका-२०२६ अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्त करण्यात आली आहे.
याअनुषंगाने पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता रद्द झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि विविध शासकीय उपक्रमांवरील निर्बंध हटले असून प्रशासनाला नियमित कामकाज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता संपुष्टात आणण्यात आली आहे.















