- ४८ तासात बोलेरो पिकअप चालकाची पोलीस कोठडीत रवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- चाकण-तळेगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी न नेता त्याचा मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झालेल्या आरोपीला उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी सकाळी खालुंब्रे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर मनोज कुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५) हे रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक खाली उतरून जखमी मनोज यांना आपल्या वाहनात घेऊन गेला. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तो फरार झाला.
घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये अपघातातील वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप असल्याचे निष्पन्न झाले. तपासात पुढे असे समोर आले की, जखमी अवस्थेतील मनोज यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यालगत टाकून पलायन केले.
या प्रकरणी आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ ची वाढ करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईचे नेतृत्व उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला करीत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर यांनी दिली.















