- मॅनेजरसह महिलेला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाकड येथील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई करत स्पाच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५ जून रोजी सायंकाळी वाकड येथील ब्ल्यू डायमंड रिलॅक्सो स्पा येथे छापा टाकला.
छाप्यात स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी स्पा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे (वय ४८) आणि स्पा मॅनेजर वैशाली संतोष चव्हाण (वय ३१) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सन २०२६ मध्ये आतापर्यंत १६ आस्थापनांवर छापे टाकले आहेत. त्यामध्ये ११ स्पा/मसाज पार्लर, ४ हॉटेल्स आणि एका ऑनलाइन माध्यमाचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३८ आरोपींना अटक करण्यात आली असून ३७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्राथमिक चौकशीनंतर २०२६ मध्ये चार आस्थापना एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये तीन स्पा आणि एका हॉटेलचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत अशा प्रकारे ३० आस्थापनांवर बंदीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अवैध वेश्याव्यवसायाविरोधातील अशा धडक कारवाया भविष्यात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.














