न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जुलै २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराची नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पुण्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षनिरीक्षक सुनील माने आणि पदाधिकाऱ्यांशी शहरातील संघटनात्मक स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणी गठित करण्यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.
याबाबत पक्षनिरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, नवीन कार्यकारिणीमध्ये महिला, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, ओबीसी तसेच सर्व संवर्गांतील निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व दिले जाईल. पक्षात दीर्घकाळ काम करणारे अनुभवी नेते आणि तरुण कार्यकर्ते यांचा समतोल साधत सक्षम संघटन उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

















