- रक्तदान शिबिर, सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महापौर रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन सोमवारी (१३ जुलै) संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सभासदांसाठी अल्पोपहार व चहापान कार्यक्रम तसेच संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली.
संस्थेत आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे महापौर रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते झाले. शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिजुर्डे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी चेअरमन शिवाजी येळवडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विश्वनाथ लांडगे, खजिनदार अभिषेक फुगे यांच्यासह संचालक, सल्लागार, माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभासदांनी संस्थेच्या सुधारित कामकाजाचे कौतुक करत वर्धापन दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

















