न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
या रकमेपैकी पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात ३४ टक्के, तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी ३३ टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित आठ मृतांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी बाधित कुटुंबांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगत शहरातील सर्व वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही सर्वंकष आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट केले.

















