- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा मनाचा मोठेपणा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहर शोकाकुल असताना, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सभा तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाची बाब म्हणजे, आजच्या स्थायी समिती सभेच्या सभापतीपदाचा मान मोशी प्रभाग 3 च्या नगरसेविका सारिका गायकवाड यांना देण्यात आला. त्यांनी सभेच्या अध्यक्षस्थानी बसून सर्व सदस्यांच्या वतीने मोशी दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरवाला मंजुरी दिली. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कामगारांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सदस्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर सभापती गायकवाड यांनी सभागृहात कोणतेही नियमित कामकाज न करता सभा २२ जुलै २०२६ पर्यंत तहकूब ठेण्याचा निर्णय घेतला.
मोशी दुर्घटनेनंतर शहरभरातून हळहळ व्यक्त होत असताना, स्थायी समितीनेही मानवी संवेदनांना प्राधान्य दिल्याचे या निर्णयातून दिसून आले. प्रशासनिक कामकाजापेक्षा दुर्घटनेतील मृतांच्या स्मृतीला आदर देणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या कृतीतून देण्यात आला.
सभापती अभिषेक बारणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सदस्यांनी स्वागत केले. दुःखद प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मृतात्म्यांप्रती आदर व्यक्त करणे ही लोकप्रतिनिधींची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थायी समितीची ही बैठक केवळ औपचारिक न राहता, मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारी ठरली.

















