न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. यावेळी बीएलओंकडून सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, माहिती पडताळणी आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
आयुक्तांनी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करून मतदार यादीतील त्रुटी निर्धारित कालमर्यादेत दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनीही बीएलओंना आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे तसेच नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलातील दुरुस्ती वेळेत करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
उप आयुक्त सचिन पवार यांनी विभागनिहाय नियोजन करून अभियानाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सर्व मतदारांनी २९ जुलै २०२६ पूर्वी एन्युमरेशन (ईएफ) फॉर्म भरावा, अन्यथा नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नसल्याचे सांगितले. ऑनलाईन तसेच बीएलओमार्फतही फॉर्म भरता येणार आहे.
















