न्युज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १७ जुलै २०२६) :- देहुरोड–देहूगाव मार्गावरील परंडवाल चौक येथे ट्रकच्या धडकेत २० वर्षीय युवकाचा मृत्यू, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (१६ जुलै) दुपारी घडली. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम मनोहर विधाटे (वय २०) व त्याचा मित्र प्रेम महेश शेवाळे (वय २०) हे अॅक्टिव्हा (एमएच १४ केएल २६६६) वरून देहुरोडहून देहूगावकडे जात होते. परंडवाल चौकात ते थांबले असताना मागून भरधाव आलेल्या अशोक लेलँड ट्रकने (एमएच १२ एलटी ७०७२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रेम शेवाळे यांचा मृत्यू झाला, तर ओम विधाटे गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी मनोहर शाम विधाटे यांच्या फिर्यादीवरून चालक बाळ विश्वनाथ बखळे (वय ३०, रा. करंज खेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

















