- चिंचवडमध्ये २२ जुलै सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- महसूल विभागाच्या विविध शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान २०२६’ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
या शिबिरात जिवंत सातबारा मोहीम, सातबारा व फेरफार उतारा, उत्पन्न, जात, अधिवास, वय, राष्ट्रीयत्व, नॉन-क्रिमिलेअर, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, वारस नोंद, आधारकार्ड दुरुस्ती, खरेदी-विक्री नोंद, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अनुदान योजनांसह विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याशिवाय महिलांना शेतकरी म्हणून नोंदणी, स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी सुविधा, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण तसेच इतर शासकीय योजनांची माहिती व लाभही नागरिकांना मिळणार आहे.
चिंचवड, आकुर्डी, पिंपरी वाघेरे, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले आहे.

















