न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत चऱ्होली येथील रेणुका शिशुगृहात सेवा उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील अनाथ व उपेक्षित बालकांसाठी आवश्यक जीवनावश्यक साहित्य आणि पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्री रेणुका महाजन ट्रस्ट संचलित रेणुका शिशुगृहाला भेट देऊन औषधे, डायपर, दूध पावडर, बिस्किटे, दलिया, गायीचे तूप तसेच इतर पौष्टिक खाद्यपदार्थ संस्थेच्या प्रतिनिधी रंजना शिंदे आणि पूनम खेडेकर यांच्याकडे सुपूर्द केले.
रेणुका शिशुगृहात बेवारस, पोलीस यंत्रणेमार्फत संरक्षणासाठी आणण्यात आलेली तसेच उपेक्षित बालकांचे संगोपन केले जाते. सध्या या संस्थेत सुमारे २० बालकांची देखभाल केली जात असून त्यामध्ये अवघ्या पंधरा दिवसांच्या नवजात अर्भकांचाही समावेश आहे. सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे संगोपन येथे केले जाते. त्यानंतर नियमानुसार त्यांचे इतर संस्थांमध्ये पुनर्वसन केले जाते. तसेच ही संस्था अधिकृत शिशुदत्तक केंद्र म्हणूनही कार्यरत आहे.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील वंचित आणि निराधार बालकांप्रती सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच खरी सामाजिक परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस, हिराचंद जाधव, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, कुणाल भोसले यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

















