- जुन्या कामाचे ६.७६ कोटी रुपये कुठे गेले?..
- ‘आप’च्या रविराज काळेंचा सवाल; चौकशीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील वृक्ष गणनेसाठी नव्याने जीआयएस-जीपीएस आधारित मॅपिंगची निविदा काढल्याने आम आदमी पार्टी युवक आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आधीच्या वृक्ष गणनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना पुन्हा नव्याने निविदा काढण्याची गरज काय, असा सवाल ‘आप’चे रविराज काळे यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी ‘टेरॅकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी संस्थेला सॅटेलाइटच्या माध्यमातून वृक्ष गणनेचे काम देण्यात आले होते. या कामासाठी महापालिकेने तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपये खर्च केल्याचा दावा काळे यांनी केला आहे. मात्र, हे काम पूर्ण झाले नसल्यास संबंधित एजन्सीला संपूर्ण रक्कम अदा का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नवीन निविदा तात्काळ रद्द करून जुन्या ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावे. काम झाले नसेल किंवा सदोष असल्यास संबंधित ठेकेदाराकडून रक्कम वसूल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून आर्थिक वसुली करावी. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आहे. महापालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.


















