- ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूलाच्या उभारणीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे रूपीनगर-तळवडे परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील प्रमुख वाहतूक प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेविका शिवानी नरळे यांनी महापालिका प्रशासनाकडे विविध उपाययोजनांची मागणी केली आहे.
त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारावा, तर तळवडे गाव चौकात उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता विकसित करावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तळवडे चौकातून चाकण औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावतो. प्रस्तावित प्रकल्पांमुळे वाहनांची कोंडी कमी होऊन चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगार व नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, ज्योतीबानगर, रूपीनगर-तळवडे, सोनवणेवस्ती आणि शेलारवस्तीतील लघुउद्योगांनाही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा आहे. रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्टॉर्म वॉटर लाईनची आवश्यकता आहे. सुमारे ३६.५२ किलोमीटर रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयामार्फत तयार करण्यात आला आहे. या कामांना प्राधान्य देऊन निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी नरळे यांनी केली आहे.


















