न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील नव्या २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पासाठी उच्चदाब वीज जोडणीचे काम गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) करण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.
याचा परिणाम बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी यासह परिसरातील नागरिकांवर होणार आहे.
शुक्रवारी (दि. ४) सकाळचा पाणीपुरवठाही अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.


















