- एफडीएची अचानक धाड; कँटीन चालकाला कारणे दाखवा नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कँटीनमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अचानक तपासणी केली. या वेळी अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कँटीन चालकाला १४ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने कँटीनची पाहणी केली. तपासणीत अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे तसेच संशयास्पद साहित्य आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले. पथकाने चार खाद्यपदार्थांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
दरम्यान, कँटीनमध्ये ग्राहकांना टेबलवर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रारही पुढे आली आहे. विकतचे पाणी घेण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला. पाणी सांडल्याने रुग्ण घसरून पडल्याचे कँटीन चालकाकडून सांगण्यात आले. मात्र, भाजी किंवा अन्य पदार्थ सांडल्यास तेही बंद करणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


















