- महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या अधिकृत ओळखीला प्रतिष्ठा व गौरवपूर्ण स्वरूप द्या…
- शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांची महापौरांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसदस्यांसाठी एकसमान स्वरूपाची अधिकृत ‘नगरसदस्य बॅच’ (Member of Municipal Corporation Badge) तयार करून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १६ च्या शिवसेना नगरसदस्या ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विविध प्रभागांमधून नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींची निवड केली आहे. हे नवनिर्वाचित नगरसदस्य महानगरपालिकेच्या सभागृहात आपापल्या प्रभागांचे प्रतिनिधित्व करत असून, महानगरपालिकेचे अधिकृत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
नगरसदस्य हे महानगरपालिकेचे अधिकृत लोकप्रतिनिधी असल्याने सभागृहातील बैठका, विविध शासकीय व प्रशासकीय कार्यक्रम, अधिकृत बैठका, पाहणी दौरे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची अधिकृत ओळख स्पष्टपणे दिसून येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगरसदस्यांसाठी प्रथमच एकसमान स्वरूपाची अधिकृत ‘नगरसदस्य बॅच’ तयार करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर बॅचवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत चिन्ह, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ तसेच ‘नगरसदस्य’ असा स्पष्ट उल्लेख असावा. ही बॅच सर्व पक्षांतील आणि सर्व प्रभागांतील नगरसदस्यांना समान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावी, असेही ऐश्वर्या तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यामुळे विविध अधिकृत कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींची ओळख सुलभ होण्यास मदत होईल. तसेच महानगरपालिकेच्या सभागृहाची प्रतिष्ठा, शिस्त आणि सन्मानजनक ओळख अधिक दृढ होईल. सर्व नगरसदस्यांना एकसमान अधिकृत ओळख मिळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी व्यवस्थेस स्वतंत्र व गौरवपूर्ण ओळख निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या बॅचचा नमुना तयार करताना महानगरपालिकेचे अधिकृत चिन्ह आणि संस्थेची प्रतिष्ठा कायम राखण्यात यावी. महापौरांच्या मार्गदर्शनानुसार तसेच संबंधित सक्षम अधिकारी व विभागांशी समन्वय साधून त्याची योग्य रचना निश्चित करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. महापौरांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसदस्या ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी केली आहे.


















