- ‘मुलगी घराची शोभा असते’; २०० वर्षांनंतर लेकीच्या आगमनाने आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- बीड एखाद्या घरात बाळाचा जन्म झाला की आनंद साजरा होतो. मात्र, परळी तालुक्यातील दहिफळे कुटुंबात एका चिमुकलीच्या जन्माने तब्बल चार पिढ्यांची प्रतीक्षा संपली आणि या आनंदाचे रूपांतर चक्क उत्सवात झाले. सुमारे २०० वर्षांनंतर कुटुंबात जन्मलेल्या लेकीचे ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
दहिफळे कुटुंबात गेल्या चार पिढ्यांपासून मुलीचा जन्म झाला नव्हता. त्यामुळे पाचव्या पिढीत चिमुकलीचे आगमन होताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दवाखान्यातून घरी आणताना या चिमुकलीसाठी खास रथाची व्यवस्था करण्यात आली. वाजत-गाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात तिची मिरवणूक काढण्यात आली.
चार पिढ्यांनंतर घरात नातीचा जन्म झाल्याचे सांगताना आजोबा भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ‘मुलगी घराची शोभा असते. आमच्या कुटुंबात मुलगी नसल्याची नेहमीच खंत होती. आता ही चिमुकली आमच्या घरात आली असून तिला फुलासारखे जपू,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या चिमुकलीचे नाव ‘गार्गी’ ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. आजीने सांगितले की, नातीला घरी आणताना मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. काकूनेही गार्गीवर भरभरून प्रेम करण्याची भावना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, ‘मुलगा व्हायलाच हवा’ या रूढ विचारांना छेद देत गार्गीच्या जन्माचा आनंद साजरा केल्याने या कुटुंबाने एक वेगळा संदेश दिला आहे. मुलीचे वडीलही म्हणाले, ‘मला नेहमीच मुलीची अपेक्षा होती. मुलीचे प्रेम वेगळे असते. मुलगी झाल्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही.’
चार पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या लेकीने दहिफळे कुटुंबाच्या घरात केवळ एका नव्या सदस्याचे आगमन केलेले नाही, तर आनंद, प्रेम आणि नव्या आशेची एक सुंदर पहाट घेऊन आली आहे.

















