- सभागृहाची प्रतिष्ठा, शिस्त आणि नियमबद्ध कामकाजावर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- आगामी महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसदस्यांची पूर्वबैठक सत्तारूढ पक्षनेते यांच्या दालनात पार पडली. बैठकीत सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि लोकहिताच्या विषयांवर केंद्रित राहावे, यासाठी सदस्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी महापौरांची परवानगी घेऊनच आपले मत मांडावे. एकाच वेळी अनेकांनी बोलणे, विनापरवानगी बोलणे तसेच इतरांच्या भाषणात अडथळा आणणे टाळावे, अशा सूचना करण्यात आल्या. चर्चेदरम्यान विषयाशी संबंधित मुद्देच मांडावेत आणि अनावश्यक वक्तव्य टाळावे, असेही सांगण्यात आले.
उपसूचना मांडावयाच्या असल्यास त्या शक्यतो किमान एक दिवस आधी लेखी स्वरूपात सादर कराव्यात. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, असंसदीय भाषा, घोषणाबाजी व गोंधळ टाळून सभागृहाची प्रतिष्ठा राखावी, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन शहराच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रभावीपणे घेण्यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य व समन्वय राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


















