- संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात काचेवर डोके आदळून तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका येथील मेट्रो स्थानकावर कर्मचाऱ्यासोबत वाद घालत पोलिसांशी हुज्जत घालणे, पोलीस शिपायाचा सरकारी गणवेश ओढणे, तसेच संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून काचेवर डोके आदळून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अमोल बापू साबळे (वय ३०, रा. वडकी नाला, रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल उत्तम काकडे (वय ३१) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पोलीस शिपाई काकडे हे दिवसपाळी कर्तव्यावर असताना पिंपरी-चिंचवड महापालिका येथील मेट्रो स्टेशनवरील कॉलच्या अनुषंगाने तेथे गेले होते. त्यावेळी आरोपी अमोल साबळे हा मेट्रो कर्मचारी अक्षय राम वानोळे यांच्यासोबत वाद घालत होता.
काकडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी साबळे याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांसोबतही हुज्जत घालून काकडे यांच्या सरकारी गणवेशास ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीला संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने दैनिक अधिकारी शेलार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच आरोपीने स्वतःचे डोके पोलीस ठाण्यातील काचेवर आदळून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आटवे करीत आहेत.


















