- बनावट ठरावाच्या आधारे न्यायालयात कागदपत्रे सादर करून मिळकत हक्क मिळविल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ सप्टेंबर २०२६) :- पीएमटी मशीन्स लिमिटेड कंपनीची पुण्यातील जमीन आणि बांद्रा येथील फ्लॅट्सच्या व्यवहारात बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात पाच जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २१ जून २०२३ ते आजपर्यंतच्या कालावधीत पीएमटी मशीन्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तनीष सौरभ बोरा (वय २४, रा. जुहू, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात नियोजनबद्ध कट रचून २८ जून २०२३ रोजी पीएमटी कंपनीची जमीन व फ्लॅट्स विक्रीबाबत समजुतीचा करारनामा केला. त्यानंतर ६ सप्टेंबर २०२३ रोजी शशी पॉल लखवारा यांना पीएमटी मशीन्स कंपनीतर्फे भविष्यात निर्णय घेण्याचा व स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिल्याचा कथित बनावट ठराव तयार करण्यात आला.
या दस्तऐवजाच्या आधारे २६ डिसेंबर २०२४ रोजी पीएमटी मशीन्स आणि अँकर पॉईंट डेव्हलपर्स कंपनीदरम्यानचे संमतीपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून अँकर पॉईंट कंपनीला पुण्यातील जागा व बांद्रा येथील फ्लॅट्सवर हक्क मागण्याचा अधिकार कायदेशीररीत्या मिळवून देण्यात आला आणि फिर्यादीची फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मोनिका शहा, शशी पॉल लखवारा, अनिल गुप्ता, अनीश गुप्ता, विनित रमेश अशर तसेच त्यांना सहाय्य करणाऱ्या इतर व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस निरीक्षक शिर्के पुढील तपास करीत आहेत.
















