न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- दिव्यांग पत्नीशी अश्लील कृत्य करून त्याचे व्हिडीओ चित्रीत केल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार १ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
पीडित महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर सुमारे सहा वर्षांपूर्वी तिचा संशयितासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. मात्र, कौटुंबिक वादानंतर दोघे वेगवेगळे राहत होते. मुलाच्या ताब्यावरून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वादातून संशयिताने महिलेला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याचे व्हिडीओ चित्रीत करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच महिलेचा चेहरा विद्रूप करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पिंपरी पोलिसांनी कारवाई केली.
संशयितावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून तो जिल्ह्यातून तडीपार होता. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच त्याने हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


















