- जमिनीच्या व्यवहारावरून वृद्ध आई-वडिलांना भर रस्त्यात मुलाने केली मारहाण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
इंदापूर (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे घडली. याप्रकरणी दोघा मुलांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम किसन राऊत (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी अंजना यांच्यासोबत रविवारी सायंकाळी तरंगवाडी परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांचे मुलगे संजय आणि राजेंद्र राऊत तेथे कारमधून आले. आईच्या नावावरील जमीन विकल्याचा जाब विचारत दोघांनी शिवीगाळ केली आणि दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत वृद्ध दाम्पत्य जखमी झाले असून, जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची अधिक चर्चा झाली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















