- महिलांच्या तक्रारींवर तत्काळ मदतीसाठी दहा समुपदेशन केंद्रे आणि स्वतंत्र पोर्टल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ सप्टेंबर २०२६) :- वाकड येथील शिल्पा गवारे या विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेवरून पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हुंडाबळी, महिलांचा मानसिक व शारीरिक छळ, पैशांसाठी होणारा त्रास तसेच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
महापालिका सभेत महिलांच्या आत्महत्या आणि छळाच्या घटनांवर चर्चा झाली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी सूचना करण्यात आली.
महापौर रवी लांडगे यांनी शहरातील सर्व दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच महिलांना त्यांच्या तक्रारी आणि समस्या ऑनलाइन नोंदविता याव्यात यासाठी स्वतंत्र पोर्टल आणि संकेतस्थळ सुरू करण्याची सूचनाही केली.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी कौटुंबिक परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. चर्चेत उपमहापौर शर्मिला बाबर, प्रशांत शितोळे, वर्षा जगताप, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, सुलभा उबाळे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे आदींनी सहभाग घेतला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.


















