- जुनी सांगवीतील दुर्घटनेने परिसरात हळहळ; मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुनी सांगवी (दि. ०५ सप्टेंबर २०२६) :- दहीहंडी उत्सव संपल्यानंतर मंडपासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर काढताना ते एका महिलेच्या अंगावर कोसळल्याची दुर्दैवी घटना जुनी सांगवी परिसरात घडली. या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडीसाठी उभारण्यात आलेले मोठे लोखंडी स्ट्रक्चर काढण्याचे काम करत होते. त्यावेळी स्ट्रक्चरचा एक भाग अचानक घसरून खाली कोसळला. याचवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सलमा पठाण यांच्या डोक्यावर लोखंडी भाग आदळला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेचा मुलगा मंडळाचा कार्यकर्ता…
या घटनेतील आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे मृत सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. मुलगा मंडळाशी संबंधित असल्याने पठाण कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांकडे औपचारिक तक्रार देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःहून दखल घेत अपघाताची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सार्वजनिक उत्सवांसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या लोखंडी स्ट्रक्चरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा संरचना उभारताना तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्या हटविताना पुरेशी खबरदारी आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.


















