- परवानगी-परवाना नसतानाही बंगल्यात डझनावारी कुत्र्यांचे बोर्डिंग..
- भुंकणे, दुर्गंधी आणि वाहतूक कोंडीने रहिवासी त्रस्त…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात निवासी भागातील बंगल्यांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या ‘डॉग हॉस्टेल’चा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. आवश्यक परवानग्या आणि व्यावसायिक परवाना न घेता स्वतंत्र निवासी बंगल्यात मोठ्या संख्येने कुत्र्यांचे बोर्डिंग चालविले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासह संबंधित प्रशासन या प्रकाराकडे नेमके किती गांभीर्याने पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
रहिवासी वापरासाठी असलेल्या बंगल्यात व्यावसायिक स्वरूपाची डॉग बोर्डिंग सुविधा चालविणे स्थानिक झोनिंग व वापराच्या नियमांशी विसंगत आहे का?, दिवस-रात्र मोठ्या आवाजात होणाऱ्या कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यातच कुत्र्यांच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. दाट लोकवस्तीच्या भागात यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
डॉग हॉस्टेलमध्ये ये-जा करणाऱ्या अनोळखी कुत्र्यांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. पाळीव प्राणी सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे अरुंद निवासी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचेही काही रहिवाशांचे म्हणणे आहे.
नियम फक्त कागदावरच?
निवासी परिसरातील अशा व्यावसायिक उपक्रमांना परवानगी आहे का? संबंधितांकडे आवश्यक व्यावसायिक परवाना आहे का? पशुवैद्यकीय विभागाची परवानगी घेतली आहे का? तसेच महापालिकेच्या झोनिंग नियमांचे पालन होत आहे का, याची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे. नियमभंग आढळल्यास संबंधित डॉग हॉस्टेलवर कारवाई करून निवासी भागातील नागरिकांना प्रशासन दिलासा देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
“निवासी भाग हा व्यावसायिक केनलमधून निर्माण होणारा पर्यावरणीय आणि सुरक्षिततेचा भार पेलण्यासाठी सक्षम नाही. अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कुत्र्यांचे व्यावसायिक बोर्डिंग सुरू असल्याने रहिवाशांच्या शांततेसह आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. PCMC प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नागरी झोनिंग नियमांची कठोर अंमलबजावणी करावी आणि आवश्यक परवानग्या नसलेला हा बेकायदेशीर व्यावसायिक उपक्रम त्वरित बंद करावा,” – दिलीपसिंग परदेशी, नागरिक, जुनी सांगवी…
“पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचार, लसीकरण तसेच नागरिकांच्या तक्रारीनुसार मोकाट व भटक्या जनावरांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्याची कामे केली जातात. महापालिकेकडून निवासी भागात ‘डॉग हॉस्टेल’ उभारण्यास कोणतीही परवानगी दिली जात नाही. असे प्रकार अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांना नोटिसा बजावून नियमानुसार कारवाई करण्यात येईल,”
– संदीप खोत, उप आयुक्त-पिं. चिं. मनपा…

















