- पतीला कर्नाटकातून २४ तासांत अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी पतीला बावधन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कर्नाटकातून अटक केली. परशुराम भाग्या हरिजन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडकरवस्ती, भुगाव येथे ही घटना घडली. आरोपीने पत्नी निलाबाई हरिजन यांच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या निलाबाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खून करण्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र आरोपीने घटनास्थळावरून घेऊन पलायन केल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा माग काढला. त्यानंतर तपास पथकातील दोन टीम कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये रवाना करण्यात आल्या.
आरोपी कर्नाटकातील विजापूर परिसरात शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त अरविंद पवार आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.


















