- १६ डॉल्बी स्पीकर, ॲम्प्लीफायर, मिक्सर जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- दहीहंडी उत्सवादरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी साउंड सिस्टिमवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६ डॉल्बी सिस्टिमवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील स्पीकर, ॲम्प्लीफायर, मिक्सर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली यांनी सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर तसेच डीजे मालकांवर कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार ५ सप्टेंबर २०२६ रोजी निगडी, पिंपरी, संत तुकारामनगर, दापोडी, हिंजवडी, बावधन, वाकड, काळेवाडी, भोसरी, दिघी आणि चाकण दक्षिण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टिमचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १६ डॉल्बी सिस्टिममधील साहित्य जप्त केले. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक शांतता आणि पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन ध्वनीवर्धक यंत्रणेचा मर्यादित व नियमबद्ध वापर करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


















