- १९८५ ते २००० च्या विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- येथील पूर्वीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १९८५ ते २००० सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. ६ सप्टेंबर) समीर लॉन्स येथे उत्साहात झाला. सुमारे ४०० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व प्रार्थना घेण्यात आली.
प्रास्ताविक बसवेश्वर हैलकर गुरुजी यांनी केले. माजी शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, बसवेश्वर हैलकर, किशोरी पुरोहित, प्रमिला होले, मिनाक्षी लोखंडे, माधुरी घिगे, विजया भोंडवे यांचा ट्रॉफी, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यरत शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सातारा, सांगली, फलटण, कोल्हापूर, चाकण आदी ठिकाणांहून विद्यार्थी आले होते. स्नेहभोजनानंतर गप्पांचा रंगला. कार्यक्रमाचे निवेदन कुमारी ऋचिका भोंडवे यांनी केले.

















